खोलमारा रेती घाटावर महसूलची ‘कृपादृष्टी’?
08/10/2026
✓धर्मापुरीला सर्जिकल स्ट्राईक, तर खोलमारावर अधिकारी ‘मूग गिळून गप्प’!
✓स्थानिक नागरिकांचा संताप; मलाईखोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तडाखेबंद कारवाईची मागणी
प्रतिनिधी लाखांदूर :
रेती तस्करीच्या मुद्यावर महसूल विभागाची दुटप्पी आणि संशयास्पद भूमिका पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. एकाच तालुक्यात दोन वेगवेगळ्या घाटांवर महसूल प्रशासनाकडून होत असलेली भिन्न कारवाई मोठी चर्चा आणि संतापाचा विषय बनली आहे. धर्मापुरी रेती घाटावर तलाठी बिसेन यांनी थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत रेतीची नाली पाडली आणि अवैध धंद्याला पायबंद घातला. मात्र, अवघ्या काही अंतरावर असलेल्या खोलमारा रेती घाटावर दिवसाढवळ्या रेतीचा अफाट अवैध उपसा आणि वाहतूक सुरू असतानाही, संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी जणू ‘मूग गिळून गप्प’ राहणेच पसंत केले आहे.
खोलमारा रेती घाटावरून सुरू असलेला हा रेतीचा काळा बाजार प्रशासनाला दिसत नाही का? असा सदान्कदा प्रश्न आता सुजाण नागरिक विचारत आहेत. एका ठिकाणी कायदा कडक आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र रेती तस्करांवर अशी विशेष 'कृपादृष्टी' का? यामागील अर्थकारणाची चर्चा आता सर्वसामान्य जनतेच्या तोंडी रंगू लागली आहे. एका बाजूला धडक कारवाईचा बडगा उगारला जातो आणि दुसऱ्या बाजूला पाठीशी घालण्याचे प्रकार घडत असतील, तर याला प्रशासकीय आशीर्वाद म्हणावे का, असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
मलिदा लाटण्याच्या नादात कर्तव्याशी प्रतारणा करणाऱ्या आणि अवैध धंद्याला अभय देणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आता वरिष्ठ कायदेशीर बडगा उगारणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या मलाईखोरी करणाऱ्या आणि डोळ्यांवर पट्टी बांधून बसलेल्या सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांवर तहसीलदार नेमके काय कठोर आदेश काढणार? याकडे आता गावकऱ्यांच्या नजरा लागून आहेत. जर या प्रकरणात तातडीने कारवाई झाली नाही, तर महसूल विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
अवैध रेती तस्करी आणि या प्रकाराला पाठीशी घालणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात तहसीलदारांकडून तातडीने कठोर पावले उचलली जातील का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.


