अमरावतीमध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल पुरुष स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; १०७ विद्यापीठांचा सहभाग .. पाच दिवस रंगणार सामने .. देशपातळीवर भव्य आयोजन
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
जनसंपर्क विभाग

अमरावती : ( दि. 2-2-2026)
श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धा २०२५-२६’ चे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. सॉफ्टबॉलच्या इतिहासात प्रथमच महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांच्या राष्ट्रीय स्पर्धा एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी आयोजित करून अमरावतीने एक नवा इतिहास रचला आहे.
खेळातून घडते चारित्र्य: पोलीस आयुक्त गणेश शिंदे
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना पोलीस आयुक्त श्री. गणेश शिंदे यांनी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. “अमरावती हे प्रदूषणमुक्त आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर असून येथील पोषक वातावरणात ही स्पर्धा होत आहे,” असे ते म्हणाले. खेळ केवळ हार-जित पुरता मर्यादित नसून तो खेळाडूंची मातीशी नाळ जोडून ठेवणारा आणि कठीण परिस्थितीत जिद्दीने उभे राहायला शिकवतो. आजची तरुण पिढी तंत्रज्ञान आणि विज्ञानात प्रगती करत असतानाच खेळाच्या माध्यमातून देशाची जबाबदारी पेलण्यास सक्षम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रकल्प महेंद्र ढोरे, उद्घाटक म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख, कोषाध्यक्ष श्री दिलीप बाबू इंगोले, अँड. जयवंत पाटील पुसदेकर, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू, डॉ. प्रवीण रघुवंशी, ए.आय.यु. चे निरीक्षक श्री दिलीप तुरकी, स्पर्धेचे मुख्य परिक्षक श्री मुकुंद देशपांडे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. तनुजा राऊत, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, डॉ. सतीश पहाडे, डॉ. विकास टोणे, डॉ. रूपाली इंगोले उपस्थित होते.
शिवाजी शिक्षण संस्थेचा ऐतिहासिक पुढाकार: हर्षवर्धन देशमुख
संस्थेचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन देशमुख यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की, “सॉफ्टबॉलसारख्या खेळाला राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी शिवाजी शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे. संपूर्ण भारतातून आलेल्या खेळाडूंना अमरावतीचे आदरातिथ्य आणि संस्कृतीची ओळख करून दिली जाईल. खेळाडूंनी मैदानावर केवळ कौशल्यच नाही, तर शिस्त आणि खिलाडूवृत्तीचेही दर्शन घडवावे, असेही ते म्हणाले.
नियोजनाची जय्यत तयारी: दिलीपबाबू इंगोले
या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल माहिती देताना श्री. दिलीपबाबू इंगोले म्हणाले की, देशभरातील १०७ विद्यापीठांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ५ तारखेपर्यंत पुरुषांचे सामने रंगणार असून ६ ते १० तारखेदरम्यान महिलांच्या स्पर्धा होतील. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अखिल भारतीय संघासाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. मैदानावर फ्लड लाईट्सची सोय करण्यात आल्याने रात्रीच्या वेळीही सामने खेळवले जाणार आहेत. खेळाडू वृत्तीने स्पर्धेत प्रदर्शन करावे आणि प्रत्येक प्रतिस्पर्धी खेळाडूचा सन्मान करावा असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप: डॉ. महेंद्र ढोरे
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी आपल्या भाषणात अमरावतीच्या क्रीडा वारशाचा गौरव केला. “खेळ हे सर्वांगीण विकासाचे साधन असून त्यातून मिळणारा संयम आणि सांघिक भावना जीवनात महत्त्वाचे ठरते. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारे हे आयोजन देशासाठी अभिमानास्पद आहे,” असेही त्यांनी सांगितले. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने या भव्य आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले. खेळाच्या माध्यमातून यंग ॲथेलेटीक्स तयार होतील. सर्व खेळाडू आपला खेळ पूर्ण क्षमतेने व शिस्तीत खेळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या स्पर्धेच्या तांत्रिक जबाबदारीसाठी श्री मुकुंद देशपांडे आणि श्री दिलीप तुरकी यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची समिती काम पाहत आहे.
सुरुवातीला क्रीडा ज्योत मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा व शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तिरंगा असलेली फुगे मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आली. याप्रसंगी खेळाडूंना खेळाडू वृत्तीने सामने खेळण्याची शपथ देण्यात आली. स्मृतीचिन्ह व पुष्प देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागतपर भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.व्ही. कोरपे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. तनुजा राऊत यांनी, संचालन डॉ. मनीष गायकवाड व डॉ. हर्षाली वानखेडे यांनी केले, तर आभार डॉ. रूपाली इंगोले यांनी मानले. डॉ. अवंतिका मानकर यांनी प्रेरणादायी गीत सादर केले. उद्घाटन कार्यक्रमाला देशभरातील सर्व विद्यापीठांचे सहभागी खेळाडू, विद्यापीठ व शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध प्राधिकारणींचे सन्माननीय सदस्य, शिक्षक अधिकारी, कर्मचारी, तसेच गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिवसभरामध्ये चाळीस संघांमध्ये सामने खेळल्या गेलेत. दि. २ ते ५ दरम्यान ह्या स्पर्धा पाच मैदानात खेळल्या जाणार आहेत. अमरावतीकर नागरिकांनी या स्पर्धांचा आनंद घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ व महाविद्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.